पुणे- जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चारही धरण क्षेत्रात बुधवारपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या धरण साखळीतील खडकवासला धरण हे शंभर टक्के भरल्यामुळे धरणाचे सर्वच्या सर्व अकराही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मुळा-मुठा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे बुधवारी सकाळी एक दरवाजा उघडून ४२८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परंतु, काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज सायंकाळी ५ वाजल्यापासून धरणातून ११ हजार ७५० इतक्या वेगाने मुळा-मुठा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणाचे सर्व अकराच्या अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता
दरम्यान, खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पुण्याच्या डेक्कन आणि पेठांचा परिसर जोडणारा भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या पुलाला लागून पाणी वाहत आहे. त्यामुळे, महापालिकेने या परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेडिंग करून ठेवली आहे. तसेच, गरज पडल्यास नदीपात्रातील रस्ता बंद करून वेळ आल्यास त्यासाठी संबंधित यंत्रणेलाही अलर्ट वर ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा- स्वातंत्र्य दिनी पर्यटकांनी लोणावळ्यात येऊ नये; पोलिसांचे आवाहन