पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे प्रशासनावरील ताणही वाढत आहे. कामाचा व्याप वाढल्यामुळे प्रशासकीय कर्मचारी अपुरे पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन 'अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा'च्या गिर्यारोहकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पहिल्या टप्प्यात ७० गिर्यारोहक पुणे महानगरपालिकेसाठी 'कोविड सेवक' म्हणून विना मोबदला काम करत आहेत.
मध्यवर्ती पुणे शहरासोबतच उपनगर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने अनेक ठिकाणी कोविड सेंटर आणि स्वॅब सेंटर वाढवली आहेत. या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक फोन करतात. त्याच बरोबर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांची माहिती घेणे, त्यांना उपचारासाठी उपलब्ध ठिकाणे आणि सेंटरची माहिती देणे, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती विचारणे, अशी अनेक कामे महानगरपालिकेचे कर्मचारी करत आहेत. मात्र, सेंटरची संख्या वाढल्यामुळे या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. मनुष्यबळाची गरज लक्षात घेता अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी गिर्यारोहक 'कोविड सेवक' म्हणून काम करतील, असा निर्णय घेतला. त्यांनी गिर्यारोहकांना 'कोविड सेवक' म्हणून सेवा देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनला प्रतिसाद देऊन अनेक गिर्यारोहक मदतीसाठी पुढे आले. सध्या 70 गिर्यारोहक 'कोविड सेवक' म्हणून काम करत आहेत.
महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रूममध्ये अनेक कामे आहेत. ज्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक होते. आमचे गिर्यारोहक या कामासाठी लगेच तयार झाले. महापालिकेच्या मदतीला धावून येणारी ही पहिलीच टीम आहे. कोविड रुग्णांशी त्यांचा थेट संपर्क येत नसला, तरी सध्याच्या भीतीच्या वातावरणात ही मुले सकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत काम करत आहेत. यासाठी आम्ही कुठलाही मोबदला घेतला नाही. गरज पडल्यास आणखी गिर्यारोहक पुरवण्याचीही आमची तयारी आहे. आणखी मुले नक्कीच मदतीसाठी पुढे येतील, असा विश्वास अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी व्यक्त केला.
कुठल्या कोविड सेंटरमध्ये किती रूग्ण आहे, किती डिस्चार्ज झाले, किती अॅक्टिव्ह आहेत यांची नोंद करणे, एखाद्या रुग्णाकडे वाहन नसल्यास त्याच्या मदतीला रुग्णवाहिका पाठवणे, संपर्क साधलेल्या व्यक्तीसोबत चर्चाकरून त्याला त्याच्या जवळच्या सेंटरची माहिती देणे, पॉजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांना जागृक करणे, अशी अनेक कामे हे गिर्यारोहक करत आहेत.