पुणे - जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करा आणि जिल्हा परिषदेकडून निश्चित करण्यात आलेल्या 406 पर्यटन स्थळांचा अभ्यास करा, तिथे कोणकोणत्या सुविधा उभारता येतील यावर विचार करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. शनिवारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यटन विकास आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
'पर्यटनस्थळांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निधीचे नियोजन करा'
पुणे जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने 406 पर्यटनस्थळे निश्चित करण्यात आली आहेत. या पर्यटनस्थळांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने निधी दिला आहे, त्याचे नियोजन करा, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. तसेच पर्यटन स्थळांवर मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करा. पर्यटन विकासासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कार्यशाळा घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन घ्या, अशाही सूचना त्यांनी बैठकीत केल्या. पुणे जिल्हयात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी पार्कींग व्यवस्था असावी. तसेच पर्यटनाच्या ठिकाणी चुकीचे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. जुन्नर तालुक्याप्रमाणे अन्य तालुके पर्यटनस्थळे घोषित होण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही अजित पवार म्हणाले. यावेळी जिल्हयातील 406 पर्यटन स्थळांच्या जमिनीची मालकी व कार्यरत मनुष्यबळ, लोणावळा येथील नियोजित नावीन्यपूर्ण पर्यटन उपक्रम, पिंपरी चिंचवडमधील पर्यटन स्थळे, किल्ले सिंहगड विकास, भीमाशंकर येथील अतिक्रमण धारकांसाठी अल्पोपहार केंद्र उभारणी, अतिक्रमण धारकांसाठी केलेली प्रस्तावित उपाययोजना, पुरातत्त्व विभाग, जिल्हयातील विशेष पर्यटन क्षेत्र, महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन विकास, कृषी पर्यटन, पर्यटनातून रोजगार निर्मिती, गड किल्ले पर्यटन विकास आदींबाबत आढावा घेण्यात आला.
हेही वाचा - हिवरेबाजारचा आणखी एक 'आदर्श' निर्णय.. कोरोनाने सर्व शाळा बंद असताना गावात वाजली शाळेची घंटा