पुणे Ajit Pawar vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आजही रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर शाब्दिक टोलेबाजी केली आहे. आज पुण्यातील मांजरी इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 47 व्या सर्वसाधारण सभेचा दौरा असताना देखील अजित पवार यांनी येण्याचं टाळलं आहे. यावर रोहित पवार यांना विचारलं असता, त्यांनी "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काम करत नसावेत, त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी ही अजित पवारांच्या खांद्यावर असल्यानं ते फक्त काम करत आहेत. म्हणून अशा कार्यक्रमाला त्यांनी येण्याचं टाळलं आहे," असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
अजित पवार यांनी बैठकीकडं फिरवली पाठ : पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48 वी सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेला अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या सभेला येण्याचं टाळलं आहे. यावेळी रोहित पवार यांना विचारलं असता, त्यांनी अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केली आहे. ते पुढे म्हणाले की, "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत काम करत आलेली आहे. मात्र ज्यांनी निर्णय घेतला, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल" असंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.
माझा 'बच्चा'सारखा बोलण्याचा स्वभाव : राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त तुम्हीच बोलत आहात, असं यावेळी रोहित पवार यांना विचारलं होतं. यावर त्यांनी "मी बोलत आहे, बाकीचे लोक संघटनेकडं लक्ष देत आहेत. संघटना मजबूत व्हावी, यासाठी हे मोठे लोक काम करत आहेत. ते काम खूप अवघड आहे. माझा स्वभाव चुकलं तर चुकलंच म्हणायचा आहे. माझा बच्चा सारखा बोलायचा स्वभाव आहे," असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
वयावरुनही केली अजित पवार यांच्यावर टोलेबाजी : अजित पवार हे सातत्यानं शरद पवार यांच्या वयाच्या बाबतीत बोलत आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की " शरद पवार आजपर्यंत मार्गदर्शन करत आले आहेत. आम्ही युवा म्हणून बोललो की आमचं वय काढलं जातं. आम्ही बच्चे आहोत, आम्ही लहान आहोत, असं आम्हाला बोललं जातं. आमच्या वयात शरद पवार हे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री झाले होते. आताच्या नेत्यांचं बघितलं तर काहींचं वय 65, काहींचं 70 तर काहींचं 63 वय आहे. या नेत्यांचं जसं वय वाढेल, तसं या नेत्यांना आमचंच योग्य आणि बाकी मुलामुलींचं वय अयोग्य असणार आहे. सत्तेत जाण्यासाठी जे वय लागतं ते त्यांच्याकडं आहे" असंही रोहित पवार यावेळी म्हणाले. सुप्रीम कोर्टात गेलं की हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं लागेल. राज्यात जनतेचे प्रश्न नाहीत, आमदारांचे प्रश्न सुटत आहेत. विधानसभा अध्यक्ष यांना भाजपाच्या मोठ्या नेत्यांचं ऐकावं लागलं आणि तसा निर्णय द्यावा लागला आहे. संविधान टिकेल का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. असंही यावेळी रोहित पवार यांनी उबाठा गटावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सांगितलं.
हेही वाचा :