पुणे: क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित युवा कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना आज पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. अश्या कबड्डी स्पर्धेतून चांगले खेळाडू पुढे येतील आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करतील असे यावेळी पवार म्हणाले.
चर्चेतून प्रश्न मार्गी लावा: बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत अजित पवार म्हणाले की, हा प्रकल्प नाणारला होणार होता. तिथे विरोध झाल्यावर बारसूमधील जागा निवडली गेली. आपण बारसूमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहो; तेथील स्थानिक लोक आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठे प्रकल्प आणले पाहिजे; मात्र हे सगळे करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, हे देखील बघायला हवे. राजकीय दृष्टीने या प्रकल्पाकडे बघू नये किंवा यात राजकारण आणू नये. जे विरोध करत असतील त्यांनी चर्चा करावी आणि प्रश्न मार्गी लावावा, असे यावेळी पवार म्हणाले.
'या' कारणाने 'कृउबास'मध्ये पराभव: विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्र आल्याचा फायदा होत असतो. शिंदे सरकारला सत्ता स्थापन करून 11 महिने झाले; पण पाहिजे तसे काम या सरकारने केलेले नाही. तसेच ज्या पद्धतीने त्यांनी सरकार स्थापित केले त्याच राग मनात ठेवूनच नागरिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटातील उमेदवारांचा पराभव केला आहे.
तर दोषींवर कारवाई व्हावी: दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनात क्रीडा विभागाने लक्ष घातले पाहिजे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील यात हस्तक्षेप केला पाहिजे. खेळाकडे राजकीय दृष्टीने न बघता काम केले पाहिजे. कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप आहेत आणि याची चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
यापूर्वीही बावनकुळेंना टोला: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सप्टेंबर, 2022 मध्ये बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बारामतीचा गड आम्ही नक्कीच जिंकू असे विधान केले होते. याबाबत विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता पवार यांनी बारामती स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, कावळ्याच्या शापाने कधी गाय मेलेली तुम्ही पाहिली आहे का? नवीन नवीन अध्यक्ष झाले की, बारामतीत येतात. कारण बारामतीत आल्यावर मीडिया बातमी उचलून धरते.
हेही वाचा: Tractor crushed kid: ट्रॅक्टरच्या अपघातात 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद