पिंपरी चिंचवड Ajit Pawar on Rohit Pawar : राष्ट्रवादीतील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यात अनेकवेळा वाकयुद्ध रंगलं होतं. याचाच अजून एक अनुभव पुण्यात आलाय. आमदार रोहित पवार यांच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार यांना माझे कार्यकर्ते, प्रवक्ते उत्तर देतील, अशी तिखट प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. ते शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
रोहित पवार बच्चा : अजित पवार शनिवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत रोहित पवार यांच्यावर टीका केली. 'रोहित पवारांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं, इतके ते मोठे नाहीत. ते अजून बच्चा आहे, माझे प्रवक्ते त्यावर बोलतील', अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय. भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याबाबत अजित पवार म्हणाले, "आमदार कांबळे यांनी माझ्यासमोर कोणाला मारलं असतं, तर मी शांत बसलो असतो का? मी पुढच्या कार्यक्रमाच्या घाईत होतो. त्यामुळं राष्ट्रगीत होताच बाहेर पडलो."
आमच्यासाठी विचार महत्त्वाचा : आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. ईडीनं ही कारवाई केली, तेव्हा रोहित पवार परदेशात होते. ते शनिवारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत, ईडीच्या कारवाईसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना जबाबदार धरलंय. “गेल्या सात दिवसात दिल्लीला कोण गेलं? भाजपामध्ये कोण गेलं? त्यावरून या छाप्यांमागच्या काही गोष्टी समजू शकतील", असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. 'माझी चूक झाली असती, तर मी परदेशातून आलो असतो का? नाहीतर मी भाजपात जाऊन सहभागी झालो असतो', असं रोहित पवार यांनी म्हटलंय. भाजपा अजित पवारांसोबत आहे. मात्र, आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा -