पुणे : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, सगळ्याच राजकीय पक्षांना सत्ताधारी असतील विरोधक असतील. सगळ्याच राजकीय पक्षांना जे संविधानाने आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्यांचा आदर करून अशा घटना जर उद्या देशपातळीवर, राज्य पातळीवर घडल्या तर त्याच्यातून जनतेचा पण अपमान होता कामा नये.
|
स्वप्नात पण राजीनामा देणार नाही : नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला पाहिजे का? यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मागणी असून काहीही फायदा नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, असे सांगितले जात आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, त्याच त्याच गोष्टी उकरून काढण्यात काहीही अर्थ नाही. नाना पटोले यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांना विचारले नाही. यातून सगळ्यांना जो काही धडा मिळायला पाहिजे, तो मिळालेला आहे. इथून पुढे अशा प्रकारचा प्रसंग एक तर कोणावर येऊ नये, आला तर या प्रसंगाची आठवण ठेवून त्यांनी विश्वास दर्शक ठरावाला सामोरे गेले पाहिजे, असे यावेळी पवार म्हणाले.
|
राज्यपाल हे महत्त्वाचे पद : राज्यपाल यांच्या भूमिकेवर अजित पवार म्हणाले की, राज्यपाल हे महत्त्वाचे पद आहे. या पदावर बसल्यानंतर त्यांनी पूर्वीची आपली पार्श्वभूमी कुठल्या पक्षाची संबंधित होती, याचा विचार डोक्यामध्ये न आणता वागले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नाही तर, अनेक राज्यांमध्ये अनेक राज्यात अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आपण पाहिल्या आहेत. सर्व वरिष्ठ नेतेमंडळींनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या एकत्र बसून त्याच्यात काय अजून थोडेफार किरकोळ बदल करून अशा प्रकारचे प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही, याबाबत विचार करावा. असे यावेळी पवार म्हणाले.
पोस्ट भरण्याचा प्रयत्न : तसेच प्रतोद यांच्याबाबतीत पवार म्हणाले की, आमच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी ज्या वेळेस राजीनामा दिला तो, राजीनामा त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना न विचारता दिला गेला. राजीनामा दिल्यावर सांगण्यात आले की राजीनामा दिला आहे. तो राजीनामा मंजूर झाल्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लावून तो विषय संपवायला पाहिजे होता. यात मी कुणाला एकट्याला दोषी धरतो, असे अजिबात नाही. अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्षच कामकाज बघत होते. अशा घटना घडल्या की, ताबडतोब त्यांनी पहिल्यांदा ती पोस्ट भरण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. बहुमत त्यांच्याकडे होते. ती पोस्ट भरली गेली असती तर त्याच विधानसभा अध्यक्षांनी या 16 लोकांना अपात्र केले असते, असे यावेळी पवार म्हणाले.
चौकशी करण्याचा अधिकार : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मला याबाबत माहिती नाही, मी दौऱ्यात होतो. माहिती घेऊन सांगतो. अनेकांना अश्या नोटीस आल्या आहेत, शेवटी वेगवेगळ्या संस्था असतात. त्यांना चौकशी करण्याचा अधिकार आहे, असे यावेळी पवार म्हणाले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे केलेल्या तक्रारीबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ते कोणत्या पक्षाचे आहे. ते शिवसेनेचे ( ठाकरे गटाचे ) आहेत. तर त्यांच्या शिवसेना विधान परिषदेचे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार यांना त्यांनी सांगायला पाहिजे.