पुणे - पाच वर्षापूर्वी माझ्याकडून अनावधानाने चूक झाली होती. मी नकळत धरणाच्या पाण्यावरुन बोललो, त्याबद्दल मी माफीही मागितली, प्रायश्चित्तही केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी जे पाच वर्षापूर्वी बोललो ते आता उकरुन काढण्याची काय गरज होती का? त्या विषयावरुन आज देशासमोरील प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल अजित पवार यांनी मोदींना विचारला आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.
पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघ महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी आणि सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्याप्रचार सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विश्वजित कदम, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते. अजित पवार यांनी विविध मुद्द्यावरून सरकार टीकेची तोफ डागली.
पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची भाजप सरकारने अद्यापही पूर्तता केली नाही. नोकऱ्यांचे प्रश्न अद्याप मार्गी लागले नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या उलट यूपीए सरकारच्या काळात नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले गेले. मंदीच्या काळात अनेक देश उद्धवस्त झाली होती. मात्र, आपला भारत तग धरून होता. याचे श्रेय तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना जाते. आमचे सरकार आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करु, पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यात येईल. असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय चालले आहे याची काळजी मोदींनी करू नये. ते आमचे कार्यकर्ते ठरवतील त्याऐवजी तुम्ही समाजाची चिंता करा. तुमच्या पाच वर्षांच्या काळात गरिबांना न्याय देण्याची भूमिका घेतली असती तर बरे झाले असते. राफेलच्या शंका दूर केल्या असत्या तर बरे झाले असते. हे सर्व न करता तुमची लोकं शेतकऱ्यांच्या मुलांना लावरीश ठरवतात. मुलींना पळवून नेण्याची भाषा करतात. याबद्दल जरा आत्मपरीक्षण करा, असा सल्ला पवार यांनी मोदींना दिला आहे.