बारामती - गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी रूग्णालयामध्ये गरजेनुसार रेमडेसिवीर अथवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल तर अशा रूग्णालयांवर तपासणी पथक नेमून कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. त्यामुळे गरज नसताना रेमडेसिवीर, अक्सिजनसाठी रूग्ण व नातेवाईकांची कोंडी करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर आतातपासणी पथकाची करडी नजर राहणार आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात 'कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक शुक्रवारी (दि. १६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. पवार पुढे म्हणाले, की या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल. शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू. सद्यस्थितीत बारामती शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. नागरिकांकडून त्या निबंर्धांचे पालन केले जाईल, यासाठी दक्ष राहून काम करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.