पुणे - 'आता जर कोणी घोषणा दिली तर त्याला तिकिटच देणार नाही', असा इशारा माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी-चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित मेळाव्यात भाषणे सुरू असताना कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर मेळावा घेण्यात आला. यावेळी विधानसभेसाठी सर्व इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह पवारांसमोर शक्ती प्रदर्शन करत होते.
हेही वाचा - भाजपला शिवसेना 'नकोशी' झालीये का?
पहिल्यांदा इच्छुक उमेदवार शेखर ओव्हाळ हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले. त्यांनी जोरदार घोषणा देत सर्व परिसर दणाणून सोडला. यावेळी अजित पवार काहीच बोलले नाहीत. सर्व कार्यकर्त्यांनी व्यासपीठाशेजारी गर्दी केली. अखेर कार्यकर्त्यांना बाजूला थांबा, असे माईकमध्ये सांगावे लागले. तेवढ्यात, पुन्हा आणखी एक इच्छुक उमेदवार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांसह व्यासपीठाच्या दिशेने येत होता. अजित पवार यांनी उठून माईकवर आता जर घोषणा दिली तर तिकीटच देणार नाही, असा दम इच्छुक उमेदवारांना दिला. यानंतर कार्यकर्ते शांत झाले.