पुणे - कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी रुग्णालयांकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
पुणे येथील विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 'कोरोना' संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणे, हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. याकामी नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसते. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाया नियमितपणे करून शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयातून प्रयत्न व्हावेत, असे अजित पवार म्हणाले.
लॉकडाऊन संदर्भातील नियम, केंद्र व राज्य शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना, तसेच पुणे जिल्हा व शहरातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी नियोजन करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.