पुणे - माळेगाव कारखाना चालवणार्या भाजपने बारामती, इंदापूरला नीरा देवधर धरणातून मिळणारे पाणी बंद केले होते. नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याचा निर्णय जर मी घेतला नसता, तर उन्हाळ्यात पिकांची धूळधाण झाली असती, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त निलकंठेश्वर पॅनलच्या प्रचारासाठी सांगवी पणदरे येथे आयोजित केलेल्या सभेत अजित पवार बोलत होते. तुम्ही शेतकरी असाल तर कारखाना ताब्यात द्या, ५ वर्षे चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील असे आश्वासनही यावेळी अजित पवार यांनी दिले.
नीरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे 55 टक्के पाणी पुन्हा डाव्या कालव्यात सोडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आम्ही फलटण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला या कोणत्याही तालुक्यावर अन्याय केलेला नाही. आम्ही समन्यायी निर्णय घेतला आहे. सत्ता असतानाही शेजार धर्म पाळला आहे. जे कारखाना चालवतात त्यांनी तुमचे पाणी बंद केले होते. बंद पाईपमधून पाणी आणणार असल्याची भाजपची कल्पना होती. मात्र, त्यामुळे पाण्याअभावी पिके जळाली असती, असेही अजित पवार म्हणाले.
माझी चौकशी लावली, आता मी चौकशी लावतो
सरकार त्यांचे असताना माझी चौकशी लावली. मी काहीच बोललो नाही. हा त्यांचा अधिकार होता. म्हणून प्रत्येक घटनेला सामोरे गेलो. आता तुम्ही कारखान्याची माहिती द्या, मी कारभाराची चौकशी लावतो. आता दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असेही पवार म्हणाले. दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे लक्षात आल्यास पंधरा दिवसातील फोनचे रेकॉर्डिंग काढणार असल्याचे पवार म्हणाले. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, हे लक्षात ठेवा, राष्ट्रवादी पक्षाने तुम्हाला पदे दिली आहेत. त्यामुळे गद्दारी केल्यास लक्षात ठेवा, असा सज्जड दमही अजित पवारांनी दिला.
कारखान्याची ही निवडणूक प्रपंच्याची असल्याचे पवार म्हणाले. येणारा अर्थसंकल्प हा चांद्यापासून बांध्यापर्यंतचा विचार करून असल्याचे पवार म्हणाले. माळेगाव कारखान्याच्या पाच वर्षाच्या कारभाराची चौकशी करणार आहे.