पुणे - विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. याबाबत मतदारांनी महाविकास आघाडीवर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या निकालातून वाचाळ बडबड करणाऱ्यांना जबरदस्त चपराक बसली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
एका वर्षापूर्वी राबवलेल्या प्रयोगाचे फलित -
राज्यात एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो प्रयोग राबवला त्याचे हे यश आहे, असे मतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
वाचाळ बडबड करणाऱ्यांना जबरदस्त चपराक - अजित पवार
निवडणुकीच्या वेळेस काही लोक वाचाळ वक्तव्य करत होते. मी त्यांची नाव घेऊन कारण नसताना वेळ घालवत नाही. या वाचाळ बडबड करणाऱ्यांना जबरदस्त चपराक बसली आहे, अशी टीका अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच नाव न घेता केली.
हेही वाचा - राहुल यांच्याकडे सातत्याची कमी; शरद पवारांनी व्यक्त केले मत
जनता महाविकास आघाडीच्या मागे -
राज्यातील सुशिक्षित तसेच शिक्षक मतदारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे, जनता महाविकास आघाडीसोबत आहे. सुशिक्षित तसेच शिक्षक मतदारांनी आम्हला निवडून दिले आहे.
तीन पक्ष एकत्र येण्याचा फायदा -
आम्ही स्वतंत्र यायचे की आघाडी करून यायचे हे आमचे वरिष्ठ ठरवतील. आम्हाला कोणी सल्ला द्यायची गरज नाही. मात्र, तीन पक्ष एकत्र येण्याचा फायदा होतो ते पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचेही पवार म्हणाले.
आगामी काळात एकत्र येऊन आघाडी करण्याचा प्रयत्न करणार -
लोकांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसहित आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. आगामी काळात जास्तीत जास्त एकत्र येऊन आघाडी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या वेगळ्या लढण्याने विरोधकांना फायदा होणार असेल, तर तसे व्हायला नको म्हणून आम्ही आगामी काळात एकत्रच येऊन निवडणूक लढवणार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.