पुणे - केंद्राने जाहीर केलेली नवी कृषी विधेयके राज्यात लागू करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कृषी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. त्यामुळे कृषी कायदा लागू न करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. नवे कामगार विधेयक देखील लागू करायचे की नाही याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करू, असे पवार म्हणाले. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी पुण्यात बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते.
मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेली स्थगिती कशा प्रकारे उठवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजासाठी मागच्या सरकारने फक्त आरक्षण जाहीर केले होते. आताच्या सरकारच्या काळात त्याची अंमलबाजवणी होत आहे, असे अजित पवार म्हणाले.
नागरिकांनी शासनाकडून येणार्या नियमांचे पालन केले आहे. असेच पालन नवरात्र आणि दसरा या सणांच्या काळात देखील करावे, असे आवाहन त्यांनी केले. पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 60 दिवसांवर गेला आहे. मात्र, गणेशोत्सवानंतर पुण्यात कोरोना वाढला असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशभरात करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य सरकार प्रत्येक नागरिकाचा विचार करून निर्णय घेत आहे. प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्याने सुरू करण्यात येत आहे. राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी देखील होत आहे. आम्हाला देखील वाटते की, ती सुरू व्हावीत. मात्र, कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सावधपणे टप्प्या टप्प्याने निर्णय घेऊ, अशी भूमिका पवारांनी मांडली.
पंडित दीनदयाळ यांच्या संदर्भात केलेले ट्विट डिलीट करण्याबाबत ते म्हणाले की, मी स्मृती जागवणारे ट्विट केले होते. नंतर ते डिलीट केले कारण कधी-कधी वरिष्ठांचे ऐकावे लागते.