पुणे- येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा आज (बुधवारी) कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राजकारणातील बहुचर्चित नात्यांचा वेगळाच रंग पहायला मिळाला. या कार्यक्रमात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील गुजगोष्टी तसेच शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यातील गप्पा अधिक चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरला.
हेही वाचा- कोल्हापुरात विक्रीचे नियम न पाळल्याने पहिल्यांदाच मटण दुकानावर कारवाई
कार्यक्रमाला यायला मुख्यमंत्र्यांना उशीर होत असल्याने इतर नेते मंचावर आले होते. दरम्यान, निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात गेलेले नेते इथे गुजगोष्टी करताना आढळले. ऐन निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटलांना शरद पवारा यांनी स्वतःच्या अगदी समोर बसवून घेतले. त्यांच्याशी गप्पा मारल्या.
लोकसभा निवडणुकीपासून विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांपासून दुरावलेले आहेत. दरम्यानच्या काळात नेमके काय राजकारण घडले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. या चर्चेबाबत मोहिते पाटील यांना विचारले असता, मी अजून ही राष्ट्रवादीतच असल्याचा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे याच कार्यक्रमात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील शेजारी-शेजारी बसून बराच वेळ गुजगोष्टी करत होते. कार्यक्रमाच्या बैठक व्यवस्थेत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या मधल्या खुर्चीवर दुसरे कुणाचे नाव होते. मात्र, अजित पवारांनी ती नावाची पाटी बाजुला सरकवली. हर्षवर्धन पाटलांना जवळ केले. या दोघांतील सख्य सर्वश्रुत आहे. मात्र, हर्षवर्धन पाटलांवर काँग्रेस सोडण्याची वेळ अजित पवारांनीच आणल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीत तर ही धुसपूस ज्वालामुखी सारखी भडकली होती. असे असताना दोघांच्या गप्पा आज खूपच रंगल्या. कार्यक्रम सुरू होऊन भाषण सुरू झाली तरी यांच्या गप्पा सुरूच होत्या. ते दोघे एकमेकांशी काय बोलतात याविषयी उत्सुकता कार्यक्रमाला आलेल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होती.