पुणे - विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलींच्या हातात एअरगन, रायफल आणि तलवारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील यमुनानगर येथे घडला आहे. तसेच या रायफलीचे ट्रिगर दाबताच त्यातून आवाज येत होता. याप्रकरणी निगडी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर यांच्यासह 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान या मार्गावर विश्व हिंदू परिषदेच्यावतीने शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेसाठी पोलिसांची परवानगी घेतली गेली नव्हती. शिवाय या शोभायात्रेत सहभागी झालेल्या चार मुलींच्या हातात एअर रायफली तर पाच मुलींच्या हातात तलवारी दिल्या होत्या. या रायफलीचे ट्रिगर दाबताच त्यातून आवाज येत होता.
दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई असतानाही विनापरवाना काढलेल्या शोभायात्रेत शस्त्र बाळगल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर यांच्यासह 200 ते 250 जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत.