पुणे (राजगुरुनगर) - मराठा समाजाला आरक्षण नाही, देशातील जिजाऊंच्या लेकी सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत मराठा बांधव शेतकऱ्यांची लेकरे आपल्या जीवनाचा संघर्ष करत आहेत. सरकारने मराठा समाजाच्या हक्काच्या मागण्या मान्य करून वेळीच मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमी असलेल्या राजगुरुनगर येथे मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
राजगुरुनगर येथील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तरुणवर्गासह महिलांचा मोठा सहभाग धरणे आंदोलनात होता. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा आक्रोश मोर्चे निघाले. त्यानंतर आजपासून शासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज राजगुरुनगर येथील तहसीलदार कार्यालयासमोर हरिनामाचा गजर करत मराठ्यांच्या आरक्षणाबाबत धरणे आंदोलन करण्यात आले.
तसेच आंदोलनादरम्यान देशभरात जिजाऊंच्या लेकीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जिजाऊंच्या लेकीला आरक्षण देऊन संरक्षण देण्याची मागणी देखील करण्यात आली.