पुणे - दोन महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शाळेतील प्रवेश प्रक्रिया आणि शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग बघायला मिळत आहे.
राज्यातील सर्व शाळा सोमवारी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळा गजबजून गेल्या आहेत. त्याप्रमाणे शाळांकडूनही विद्यार्थ्यांचे नावीन्यपूर्ण पद्धतीने स्वागत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर, न्यायमूर्ती म. गो. रानडे आदी महापुरुषांच्या वेशभूषा साकारून शाळेचा पहिला दिवस साजरा केला. मात्र, या विविध उपक्रमांमुळे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन चैतन्य बघायला मिळत आहे.
त्याप्रमाणेच काही विद्यार्थी विविध शाळांमध्ये नवीन प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर काही विद्यार्थी आणि पालक शालेय वस्तू खरेदीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे बाजारातही वह्या, पुस्तके आणि अन्य शालेय साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे.