पुणे : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेकडून वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु होता. त्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी जाहिरात बदलण्यात आली. पण जहिरातीवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी अटलजी असताना युती केली होती. उलट मधल्या एक वर्षात या युतीत ज्याने मिठाचा खडा टाकला होता. तो आम्ही बाजूला काढून टाकला आहे. आमच्यात जाहिरातीमुळे काहीही होणार नाही. माझी आणि फडणवीस यांची दोस्ती चांगली आहे. आमची खुर्चीसाठी सत्तेसाठी पदासाठी युती झालेली नाही, असे यावेळी शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.
'एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्यामुळे आमची युती तुटणार नाही. आमची युती वैचारिक भावनेतून झालेली आहे. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जिल्ह्यात 2 लाख 86 हजार लाभार्थीं : शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने नवीन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आता पर्यंत 13 ते 14 कार्यक्रम शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आले आहे. नागरिकांचा अतिशय मोठा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभत आहे. आता पर्यंत पुणे जिल्ह्यात 2 लाख 86 हजार लाभार्थींनी 103 शिबिरांमध्ये लाभ घेतला आहे. ज्या ज्या ठिकाणी शिबिर घेतली जात आहे. त्या त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. शासन आपल्या दारी या उपक्रम सुरू करण्याचा हेतू म्हणजे सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहे, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना विविध सरकारी कार्यालयात चकरा मारता येऊ नये. त्याला लागणारी प्रमाणपत्र हे देखील एकाच छताखाली मिळत आहे, म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शासन आपल्या दारी उपक्रमावर विरोधी पक्षाकडून टिका केल्या जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, आधीच सरकार हे घरी होत आणि आत्ता आमचे सरकार हे लोकांच्या घरी जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत लोकांना थेट प्रमाणपत्र देत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
देशासाठी सावरकरांचे योगदान : कर्नाटक सरकारने शालेय शिक्षणातून सावरकरांचा धडा काढला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सावरकर, हेडगेवार हे अतिशय माननीय व्यक्तिमत्त्व आहे. हे लोक दैवत आहे. सावरकर यांनी तर या देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न केला आहे. तो कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांनी जर असे केले असेल तर त्यांचा निषेध आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.