मावळ (पुणे) - ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्यात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले होते. याचपार्श्वभूमीवर आज (शनिवार) पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखण्यात आला होता. यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महामार्ग खुला केला आहे. तर, दुसरीकडे प्रवासी आणि वाहनचालकांनी ताटकळत थांबावे लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांना तिलांजली दिल्याचे पाहायला मिळाले.
आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच -
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये कार्यकर्त्याना पोलिसांनी नोटीस बजावून देखील पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग एक तास रोखून धरल्याच पाहायला मिळाले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत भाजपाचा लढा सुरू असेल, असे बाळा भेगडे यांनी म्हटले आहे.
वाहनांच्या दुतर्फा रांगाच रांगा -
दरम्यान, आंदोलकांनी अवघा टोल नाका काबीज करत दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक बंद केली होती. एक तास वाहतूक बंद असल्याने काही किलोमीटरच्या रांगा महामार्गावर बघाल्यास मिळाल्या. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशी संतप्त झाले होते.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग चोख बंदोबस्त -
ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोखला जाणार होता. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी याठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला होता. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ते रास्ता रोखोतून रोष व्यक्त करणार आहेत. याचा आढावा आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द करण्याच्या मागण्या
कोर्टाच्या आदेशानंतर ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओबीसीचे हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर यामध्ये आता ओबीसींच्या राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने हा मुद्दा चिघळला आहे. या परिस्थितीत या निवडणुका रद्द व्हाव्यात, अशी भूमिका भाजपच्यावतीने घेण्यात आली आहे.
आरक्षण पूर्ववत मिळावे यामागणीसाठी भाजपाकजून राज्यभरात जवळपास एक हजार ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच या निवडणुका रद्द कराव्यात, गरज पडल्यास राजसरकारने सुप्रीम कोर्टात जावे, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. यानंतरही निवडणुका रद्द होत नसल्यास भाजपकडून पूर्णच जागेवर ओबीसी उमेदवार उभे करून निवडणुकांना समोर जातील आशीही भूमिका घेतली आहे.
हेही वाचा - ओबीसी आरक्षण; देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन