पेण (रायगड) - पेण येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनवर दरोडा टाकून 56 लाख 34 हजार 800 रुपये रोकड घेऊन पळून गेलेल्या दरोडेखोरांनी पेण पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच रविवारी सकाळी पेण तुरूंगातून आरोपीने पळ काढल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर दुपारी पुन्हा त्या आरोपीला अटक करण्यात आली.
प्रातविधीसाठी गेला अन्...
बिरू गणेश महातो (वय 19, झारखंड) असे आरोपीचे नाव आहे. बिरू हा पोकलॅंड मशीन ऑपरेटर आहे. वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाबळ परिसरातील कार्ली गावात आरोपीने त्याच्याच सहकारी राजेंद्र यादव (वय 42, झारखंड) याला गंभीर मारहाण केली. राजेंद्र यादव यांनी आरोपीविरोधात वडखळ पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. बिरू गणेश महातो यास पेण पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान रविवारी आरोपीला प्रातविधीसाठी सकाळी बाहेर काढण्यात आले. मात्र संधीचा फायदा घेत आरोपीने शौचालयाच्या बाजूच्या भिंतीवरून उडी मारून प्रभू आळी मार्गे पळ काढला. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
अख्खी पोलीस यंत्रणा लागली कामाला -
कोठडीतील आरोपी पळून गेल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. आरोपीच्या शोधासाठी अख्य पोलीस स्टेशन कामी लागले. पोलिसांनी पेण शहर, मुंबई-गोवा महामार्ग, पनवेल, पेण खोपोली महामार्ग, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन परिसराचा शोध घेतला. गुन्हे शाखेने देखील तपासाची चक्रे फिरवली. अखेर सायंकाळपर्यत आरोपीचा शोध न लागल्याने ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. दरम्यान शहरातील एका बँक परिसरात एक संशयित व्यक्ती दुपारपासून फिरत असल्याचा फोन तेथील कर्मचाऱ्याने पोलिसांना केला. लगेच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली.