पुणे - फेसबुक, व्हाट्सऍप वरून चॅटिंग करत अनेकदा चोरी केल्याच्या घटना पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. परंतु, 'पबजी' या गेमद्वारे संभाषण करत पिंपरी-चिंचवड परिसरात सोन साखळी हिसकावणाऱ्या टोळीला सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे. अगोदर पोलिसांना चोरट्यांचे धागेदोरे मिळत नव्हते. परंतु आरोपींना पोलीस मागावर असल्याचे समजले होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - गांजा विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून टोळक्याचा एकावर गोळीबार
या घटनेप्रकरणी अश्विन आनंदराव चव्हाण (वय 19 रा. नवी सांगवी), गणेश बाळू मिंडे (वय 27 रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी पोलिसांनी यांच्या गणेश हनुमंत मोटे (वय 20, रा. नवी सांगवी) या साथीदाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोटारसायकल असा 3 लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हेही वाचा - #CoronaVirus : चीनमध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणारा 'तो' सुखरूप परतला
पिंपरी-चिंचवडच्या सांगवी परिसरात सततच्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. अखेर याप्रकरणी एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर हे चोरटे पबजी गेम आणि इन्स्टाग्राममार्फत संपर्कात राहत असल्याचे समोर आले आहे. दोन्ही आरोपी हे पबजी आणि इन्स्टग्रामच्या संपर्कात राहून चोरी करण्याची योजना आखत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल अशी अपेक्षा होती'
पोलीस कर्मचारी नरळे आणि भिसे यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, आरोपी हे सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पबजी आणि इन्स्टग्रामचा वापर केल्याचे समोर आले. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.