पुणे - खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. तो कुप्रसिद्ध रावण टोळीचा सदस्य असून या टोळीचा तोडफोडीसह गुन्ह्याच्या घटनांमध्ये सहभाग असतो. आकाश विजय पवार ( वय - २४ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला गुन्हे शाखा युनिट ५ ने लातूर जिल्ह्यातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षांपूर्वी आरती पाहत असताना वाद झाला होता. या वादातून अमित सुभाष पोटे या तरुणाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपी आकाश हा फरार झाला होता. तेव्हापासून आरोपी आकाशचा शोध पिंपरी-चिंचवड पोलीस करत होते.
आरोपी आकाशची माहिती खबऱ्याकडून पोलीस कर्मचारी शामसुंदर गुट्टे यांना मिळाली. त्यानुसार याबाबत पोलीस अधिकारी बाळकृष्ण सावंत यांना माहिती देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला, बहिरट आणि गुट्टे यांचे पथक लातूरला रवाना करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील हडोळती येथून आकाशला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.