दौंड - सातारा महामार्गावर वाहनचालकांच्या लुटमार प्रकरणी शिरूर पोलीसांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले. यामध्ये दौंड तालुक्यातील कानगाव येथील भाऊसाहेब उर्फ अण्णा मधुकर फडके (वय 32), अनिल हनुमंत चव्हाण (वय 19) या दोघांसह एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. न्याययालाने या आरोपींना आणखी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपी दौंड शिरूर सातारा राज्य मार्गावर आंधळगाव (ता.शिरूर ) येथे दरोड्याच्या तयारीत होते. आलिशान गाडीतून वाहनचालकांना लुटणाऱ्या या टोळीला शिरूर पोलिसांनी सिने स्टाईल पद्धतीने पाठलाग करत 28 नोव्हेंबला अटक केली होती. तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
पकडलेल्या आरोपींकडून हत्यारे आणि गाडी जप्त-
पकडलेल्या आरोपींकडून छऱ्याची बंदुक, एक तलवार, दोन लाकडी दांडके, दोन नकली गाड्यांच्या नंबर प्लेट, व एक फॉर्च्युनर कार असा 25 लाख 18 हजार 650 ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शिरूर पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने आज या आरोपींच्या पोलीस कस्टडीत आणखी दोन दिवस वाढ केली. हे आरोपी सराईत असून त्यांना अजून एका चोरीच्या प्रकरणात वर्ग करण्यात आले आहे. या आरोपींवर दरोडा, अपहरण, लुटमार, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी अनेक गंभीर गुन्हे केल्याची शक्यता आहे. त्यादुष्टीने तपास सुरू आहे, अशी माहिती जगदाळे यांनी दिली.
भाऊसाहेब उर्फ अण्णा मधुकर फडकेची गावांमध्ये दहशत-
अटक केलेल्या आरोपीत कानगाव येथील भाऊसाहेब उर्फ अण्णा मधुकर फडके याची कानगाव, पाटस स्टेशन, गार, हातवळण व मांडवगण फराटा या भागात दहशत आहे. शेतकऱ्यांना दमदाटी करून बेकायदा वाळू उपसा करणे, मारहाण करणे, असे प्रकार तो सातत्याने करीत आहे. भीमा नदी पात्रात वाळू चोरी केल्याप्रकरणी त्याच्यावर पाटस पोलीस चौकीत गुन्हा दाखल आहे. पाटस पोलीस चौकीत या आरोपीच्या विरोधात अनेक तक्रारी सातत्याने येत असतात. मात्र, राजकीय पाठिंबा आणि पैशाच्या जोरावर अनेक प्रकरणी तडजोडी करून मिटवण्यात हा माहिर असल्याची माहिती आहे.
सखोल चौकशी करण्याची मागणी-
एका सामाजिक संघटनेचा तो कार्यकर्ता आहे. आलीशान गाडीत आणि कंबरेला पिस्तूल लावून तो वावरत असतो. याला शिरूर पोलिसांनी अटक केल्याने याच्या दहशतीला लगाम बसला आहे. यामुळे शिरूर पोलीसांनी भाऊसाहेब उर्फ अण्णा मधुकर फडके याची सखोल चौकशी करावी अशी मागणी या परिसरातून होत आहे.
हेही वाचा- महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ४,९२२ नवीन रुग्णांचे निदान, ९५ रुग्णांचा मृत्यू
हेही वाचा- शरद पवार यांचा सल्ला वडिलधाऱ्यांसारखा घ्यावा; यशोमती ठाकुरांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर