पुणे - सिंहगड रस्ता पोलिसांच्या हद्दीत आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. अवघ्या दोन तासात पोलिसांनी खुनाचा छडा लावला असून खून करणाऱ्या मित्राला सिंहगड पोलिसांनी अटक केली.
बंडू निरंजन इंगळे (वय 40), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर वीरेंद्र रामविलास सिंग (वय 20) याला पोलिसांनी अटक केली. समलैंगिक संबंधाला विरोध केल्याने खून केल्याचे आरोपीने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाजवळील टेकडीवर एक जळालेल्या मृतदेह आढळला. पोलिसांना या मृतदेहाच्या पॅन्टमध्ये एक ईसीजी रिपोर्ट सापडला. त्यावर एक मोबाईल क्रमांक होता. त्यानुसार पोलिसांनी फोन करून संबंधित व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता मंगळवारी (दि. 10 मार्च) रात्री वीरेंद्र रामविलास सिंग हा मृत व्यक्तीसोबत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने दारूच्या नशेत खून केल्याची कबुली दिली.
आरोपी आणि मृत दोघेही मजुरीची कामे करतात. एका बांधकामाच्या ठिकाणी त्यांची ओळख झाली होती. आरोपी उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त तो पुण्यात राहतो. मंगळवारी रात्री ते टेकडीवर दारू पीत बसले होते. यावेळी वीरेंद्र सिंग याने बंडू इंगळे याच्याकडे समलैंगिक संबंधांची मागणी केली. बंडू इंगळे याने विरोध केल्याने आरोपीने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात बिअरची बाटली घातली आणि दगडाने त्याचे डोके ठेचले. त्यानंतर जवळपासची लाकडे गोळा करून पेटवून दिले. पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील ताकवले करीत आहेत.
हेही वाचा - वडिलांना शिवीगाळ केल्याचा राग.. तलवार, कोयत्याने वाहनांची तोडफोड