पुणे - मुंबईत 'डॉन' बनण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलांनी एका वाटसरूचा खून केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. दत्तात्रय कृष्णाजी माजला (वय - 41) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.
गेल्या आठवड्यात देहूरोड परिसरात मृत दत्तात्रय कृष्णाजी माचर्ला यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. त्यांच्या खिशात ओळखपत्र किंवा मोबाईल नव्हता. तेव्हाच, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना कॉलर आणि पॅन्टचा टॅग दिसला. दोन्ही एकाच नावाने होता. प्रिन्स टेलर BWD असे टॅगवर उल्लेख होता. त्याचा नेमका अर्थ काय होतो याचा शोध पोलिसांनी लावला. तेव्हा, BWD चा अर्थ हा भिवंडी असल्याचे समजले.
पोलिसांनी तातडीने त्या शहरात जाऊन प्रिन्स नावाच्या टेलरचा शोध घेतला. शहरात त्याच नावाचे २५ टेलर्स असल्याचे समोर आले. यानंतर जिथे मृत व्यक्तीने कपडे शिवले होते त्याचा अचूक शोध लावला. त्या टेलरकडून त्यांच्या कुटुंबाचा पत्ता मिळवला. पोलिसांनी कुटुंबीयांकडून मृत दत्तात्रय यांचा मोबाईल नंबर मिळवत तांत्रिक बाबी तपासल्या. यानंतर आरोपींचा छडा लागला.
काय होता घटनाक्रम?
लॉकडाऊनपूर्वी मृत दत्तात्रय हे भिवंडीवरून सोलापूरला नातेवाईकाकडे गेले होते. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन लागले. पत्नी आणि मुलांची आठवण येत असल्याने ते सोलापूर येथून भिवंडीला चालत निघाले. याचवेळी तीन अल्पवयीन आरोपी आणि अनोळखी मृत दत्तात्रय हे निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात भेटले. तिघांनी दत्तात्रय यांना पैसे मागितले. मात्र, त्यांच्याकडेच पैसे नव्हते. अल्पवयीन तिघांपैकी एक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्यांचा पाठलाग करू आणि मध्यरात्री झोपण्याची वाट पाहू असे इतर दोघांना सांगितले. यानंतर दत्तात्रय हे झोपताच त्यांच्या डोक्यात दगड घालून तिघांनी त्यांचा खून केला. तसेच खिशातील ५०० रुपये आणि मोबाईल घेऊन तिघेही पसार झाले.
मुख्य सूत्रधार अल्पवयीन हा मुंबईमधील बालसुधारगृहात होता. त्यानंतर त्याला हैदराबाद येथे रवानगी करण्यात आली. त्या ठिकाणी इतर दोघांची ओळख झाली. मुंबईमध्ये जाऊन 'भाई' बनू असे म्हणून तिघे जण मुंबईला चालत जात होते. संबंधित कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्या पथकाने केली आहे.