पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी (ता. दौंड) गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. समोरुन चाललेल्या टेम्पोला भरधाव चारचाकीने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये चारचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील श्वेता अनिल मुलीया या त्यांच्या कुटुंबासह हैद्राबाद येथे फिरायला गेल्या होत्या. तेथून हे कुटुंब पुण्याकडे परत जात होते. आज पहाटे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी गावाजवळ कारचालकाने समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात, गाडीचा वेग जास्त असल्याने समोरच्या टेम्पोला (MH21 X 3483) चारचाकीने (स्विफ्ट - MH 12 ML9913) मागून धडक दिली.
या अपघातात श्वेता मुलीया यांचे पती अनिल मुलीया आणि गाडी चालक गोपाळसिंग प्रभसिंग रजपूत यांच्या डोक्यास जखम झाली होती. अपघातानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने महामार्गावरील रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी दौंडला पाठवले. रुग्णालयातील डॉक्टरांनी अनिल मुलीया यांना तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याने, श्वेता अनिल मुलीया यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये चालक गोपाळसिंग विरूध्द तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा : 'त्या' तरुणीचा खून गळा आवळून, ओळख पटली