पुणे - आजवर अनेक रोबो आपण पाहिले आहेत. मोठमोठ्या शहरातील विविध हॉटेल, कंपन्या अशा अनेक ठिकाणी या रोबोचा वापर देखील केला जात आहे. पण पुण्यातील विनीत देशमुख या विद्यार्थ्यांने कोरोनाच्या काळात बाप्पाची मनुष्य विरहित सेवा करण्यासाठी एक शक्कल लढवली आहे. त्याने बाप्पाची आरती करण्यासाठी एक रोबो बनवला आहे. हा रोबो फक्त बाप्पाची आरती करत नाही तर त्यासोबत तो टाळ, ताशा आणि घंटादेखील वाजवतो. विनीतने बनवलेल्या या भन्नाट रोबोचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विनीत आत्ता १० वी उत्तीर्ण झाला आहे. लहानपणापासूनच विनीतला रोबोटिक्सच वेड आहे. इयत्ता ३ री पासून तो रोबो बनवत आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक रोबो बनविले आहेत. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती गणपती यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. उत्सवात आरती करताना पूजेच्या साहित्यातून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मी हा आरती रोबो तयार केला, असे विनीत सांगतो.
या रोबोचे वैशिष्ट्य म्हणजे तो आरती करतो, घंटी वाजवतो, टाळ वाजवतो आणि ताशादेखील वाजवतो. हा रोबो प्रोग्रामिंगवर चालतो. या रोबोटमध्ये अटमेगा 8 प्रोग्रामिंग बोर्ड वापरला आहे. या रोबोचा मूळ ढाचा स्टीलचा असून सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लैंग्वेज वापरली गेली आहे. मला हा रोबो करण्याची कल्पना आरती करताना आली. जे दिव्यांग लोक आहेत, त्यांना देखील हा रोबो फायदेशीर ठरू शकतो, अशी माहिती विनीत देशमुख याने यावेळी बोलताना दिली.