पुणे : गोविंदा रे गोपाळाच्या गजरात दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यासमधील मुलांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क घालत दहीहंडी उत्सव साजरा केला. कोणतेही मानवी थर न लावता श्रीकृष्णाच्या वेशातील विघ्नेश भोई या चिमुकल्याने दहीहंडी फोडून निरोगी आरोग्याचा संदेश दिला.
दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी म्हटलं की सर्वत्र शहरात उंच उंच थर लावताना बालगोपाल दिसतात. मात्र, यावर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे सोमवार पेठेतील भोलागिरी शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत ‘आरोग्याची दहीहंडी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, युवाशाहीर होनराज मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, सुरेश तरलगट्टी, एकलव्य संस्थेचे मल्हारी कांबळे आदी उपस्थित होते. कै. प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ माता यशोदा सन्मान वंचित मुलांचे बालसंगोपन करणाऱ्या एकलव्य न्यासाच्या प्रतिभा श्रीयन यांना प्रदान करण्यात आला.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही वंचित मुलांना उत्सवांचा आनंद घेता यावा, याकरीता या उपक्रमाचे प्रतिकात्मक पद्धतीने आयोजन करण्यात आले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची दहीहंडी उभारण्यात आली. यातून मुलांना निरोगी आरोग्याचा संदेश देण्यात आला. तसेच आरोग्यविषयक साधने देखील देण्यात आली. दहीहंडीनिमित्त मुलांना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले.