पुणे Aaditya Thackeray : दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून २४ ऑक्टोबरला मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय भाषण करतील याकडे सर्वांचचं लक्ष लागलंय. या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाकडून होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारलं असता, 'गद्दारांचा गट असतो, आमचा पक्ष आहे. शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून राज्यातून मोठ्या संख्येनं लोक येणार आहेत', असं ते म्हणाले.
लाठीचार्जचा आदेश कोणाचा होता : मराठा आरक्षणाबाबात मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिला होता, तो २४ तारखेला संपतोय. यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला प्रश्न केले. 'सरकारकडून अजून ठोस आश्वासन आलं का? तो लाठीचार्ज कुणी केला? गोळीबार कुणी केला? जनरल डायर कोण आहेत? याचं उत्तर आलेलं नाही. नुसतं आश्वासन दिलं जात आहे. गृहमंत्र्यांनी नक्की सांगावं की त्या आंदोलकांवर लाठीचार्ज कुणी केला? कोणी करायला सांगितला होता? हे आदेश मुख्यमंत्र्यांचे होते की उपमुख्यमंत्र्यांचे, हे त्यांनी सांगावं', असं ते म्हणाले.
जनतेचा रोष दिसतोय : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून समाज आक्रमक झाला आहे. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आज प्रत्येक बाबतीत जनतेचा रोष दिसतोय. जनता रत्यावर येत आहे. शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. कृषी आणि उद्योग क्षेत्र कोलमडलंय. हे घटनाबाह्य सरकार दंगली भडकवण्याचं काम करतंय. जनता या सरकारला दार दाखवेल अशी खात्री आहे', असं ते म्हणाले.
आशिष शेलारांचा समाचार घेतला : आशिष शेलारांच्या ट्विटवरून आदित्य ठाकरेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. 'त्यांना थेरपीची गरज आहे. पक्षातून त्यांना काही न मिळाल्यामुळे रोष बाहेर येतोय. यात आमचा काही संबंध नाही. हा मंत्री आणि त्यांच्यातला वाद असावा. यांना सिनेट निवडणूक घेण्याची हिंमत नाही', असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :