पुणे - महिलेच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून महाविद्यालयीन तरुणीला अश्लील फोटो, व्हिडिओ आणि मेसेज पाठविणाऱ्या साताऱ्यातील तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संदीप गणपत जाधव (वय 28) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका महाविद्यालयीन तरुणीने चतुशृंगी पोलिसात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप जाधव याने फेसबुकवर एका महिलेच्या नावाने बनावट खाते उघडले. त्या खात्यातून त्याने तरुणीस फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि फेसबुकच्या मेसेंजरमध्ये त्याने अश्लील फोटो, व्हिडिओ आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. हा प्रकार वारंवार होत असल्याचे पाहुन संबंधित तरुणीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना, हे फेसबुक खाते कुठून ऑपरेट होते याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांना सातारा येथून हे फेसबुक खाते चालत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने सातारा येथे जाऊन त्याला अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून मोबाईल फोन, सिम कार्ड जप्त करण्यात आले.
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमाद्वारे अनोळखी व्यक्ती या ओळखीचे असल्याचे भासवून तुमच्याशी मैत्री करू पाहतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकार करू नये. जर कुणाची अशाप्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केले.