पुणे(बारामती) - बारामती शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शासकीय रुग्णालयांंबरोबरच खासगी रुग्णालये व ठिक ठिकाणी उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटरमध्ये बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे अनेक बाधितांचे हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन बारामतीतील एका तरुण उद्योजकाने स्वखर्चाने बारामती तालुक्यातील पळशी येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागातील हे पहिलेच कोविड केअर सेंटर आहे....
बारामती तालुक्यातील पळशी येथील तरुण उद्योजक आनंद लोखंडे यांनी विद्यानंद फाउंडेशनच्या माध्यमातून पळशी गावात ५० बेडचे 'कै.शोभाताई लोखंडे' यांच्या नावाने कोविड केअर सेंटर उभे केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रशासन व आरोग्य सेवेची अक्षरशः तारेवरची कसरत सुरू आहे. बारामती शहर व तालुक्यात दररोज ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनावर देखील प्रचंड ताण आहे. बारामती शहरामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत कोविड केअर सेंटर उभे केले. मात्र, ग्रामीण भागात त्यातही जिरायत पट्ट्यामध्ये हे कोविड केअर सेंटर उभे राहिल्याने येथील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सध्या सर्वत्र वैद्यकीय आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. अशा काळात अनेक राजकीय पदाधिकारी तसेच उद्योजक वर्ग मदतीपासून अलिप्त आहे. त्यांच्यासमोर लोखंडे यांनी आदर्श घालून दिला आहे.
रुग्णांना सेंटरमध्ये मिळतात 'या' सुविधा -
या कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांसाठी विद्यानंद फाउंडेशनच्यावतीने गरम व गार पाणी, वाफेचे मशीन, आवश्यक त्या सर्व गोळ्या, जेवण सेवा आदी आवश्यक सेवा पुरवल्या जात आहेत. या कोविड सेंटरचे नियोजन व कामकाज फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रीती निंबाळकर यांच्या देखरेखी खाली सुरू आहे. पळशी गावचे सरपंच रावसाहेब चौरमले यांची सेंटर उभारणीस मोलाची मदत झाली. प्राथमिक आरोग्य केंद्र पळशीचे पथक येथे रुग्णांना उपचार देत आहे.
फाउंडेशनचे सामाजिक कार्य कौतुकास्पद -
मागील वर्षीच्या टाळेबंदीत विद्यानंद फाउंडेशनच्या माध्यमातून बांधकाम मजुरांच्या कुटुंबीयांना दररोज महिनाभर मोफत शंभर लिटर दूध वाटप करण्यात आले. तसेच अनेकांना मास्क, सॅनिटायझर वाटप केले असून ते अद्याप दिले जात आहे. तसेच बारामतीतील तांदुळवाडी येथे असणाऱ्या अभयारण्यात पशु पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी १७ हजार लिटर क्षमतेचा सिमेंटचा पाणवठा बांधला आहे. याबरोबरच विद्यानंद फाउंडेशन, व विद्यानंद अॅग्रो फीडस्च्या माध्यमातून पळशी गावात कीर्तन महोत्सव युवा वर्गासाठी कबड्डी, क्रिकेट सामने असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
म्हणून कोविड सेंटर उभारले -
सध्या प्रत्येकाचा जीव वाचवणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. अनेकांची बेडसाठी होणारी धावपळ पाहत होतो. त्यातूनच एखाद्या गावासाठी कोविड केअर सेंटर उभे करण्याची संकल्पना समोर उभी राहिली. ग्रामीण त्यातही जिरायती भागात असे कोविड केअर सेंटर नसल्याने तिथे हे सेंटर उभे करण्याचा निर्णय घेतला. सध्या आसपासच्या गावामध्ये कोरोनाबाबत विद्यानंदच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती विद्यानंद अॅग्रो फीडस्चचे चेअरमन आनंद लोखंडे यांनी दिली.