पुणे - नाशिक महामार्गावर खेड घाटात एका ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, यामुळे खेड घाटात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. राजगुरुनगर पोलीस व महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जात असताना खेड घाटामध्ये एका मालवाहू ट्रकचा घाट उतरत असताना ब्रेक निकामी झाला. त्यामुळे वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. यामुळे घाटाच्या दोन्ही दिशेला दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन तासानंतर पोलिसांनी वाहतूक मार्ग मोकळा केला.
दरम्यान, खेड घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. बाह्यवळणाचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण होणार होते. मात्र, आद्यप हे काम अपूर्ण असून यामुळे खेड घाटात होणारे अपघात व त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. बाह्यवळणाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.