आंबेगाव (पुणे) - काठापूर बुद्रुक येथील विश्वनाथ हिंगे या शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना एक महिन्याचा बिबट्याचा बछडा आढळून आला आहे. भुकेने व्याकुळ झालेला बछडा आढळून आल्याने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बछड्याला मादीकडे सोडण्यासाठी ऊसशेतीच्या बाजुलाच त्याला ठेवण्यात आले आहे, तसेच ऊसतोड बंद ठेवण्यात आली आहे.
वनविभागाचे प्रयत्न सुरू
जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. ऊसशेतीत तो आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्येही घबराट आहे. त्यात बिबट्याचे बछडे बाहेर पडत आहेत. बिबट्या शिकारीच्या शोधात असताना बछडे मादीपासून दुरावले जात आहेत. अशातच एक बछडा ऊसतोड सुरू असताना आढळून आला आहे. या बछडा आणि मादीची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत. तर काठापूर परिसरातील ऊसतोड सध्या बंद ठेवण्यात आली आहे.
बिबट्यासह बछड्याच्या संगोपनाची गरज
आज सकाळी जारकरवाडी येथे एक बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. तर पारगाव येथे एक बछडा भुकेने व्याकुळ होऊन उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बिबट्या व बछड्यांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे बिबट्यांच्या संगोपनासाठी वनविभागाने वेळीच उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.