पिंपरी-चिंचवड (पुणे) - कोरोना या महाभयंकर महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले असून महाराष्ट्रातदेखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना म्हणजे मृत्यूच असा काही नागरिकांचा समज झाला आहे. मात्र, कोरोना म्हणजे मृत्यू, असे काही नसून अनेक कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. याचेच उत्तम उदाहरण पिंपरी चिंचवड शहरात बघायला मिळाले. येथे एका 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाबर मात केली आहे.
90 वर्षाच्या आजींना 30 जून रोजी कोरोनाचीबाधा झाली होती. त्यानुसार त्यांच्यावर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर आणि प्रबळ इच्छाशक्ती जोरावर आजींनी कोरोनाला हरवले आहे. 15 दिवसांच्या उपचारानंतर आजींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आजींचे सर्वांनी स्वागत केले. आजींच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी फुलांची उधळण, रांगोळी आणि टाळ्यांच्या कडकडाटात केला.
शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. त्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. मात्र, योग्य खबरदारी घेतल्यास कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.