पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये वडिलांना शिव्या दिल्यावरून 8 तरुणांना आणून 4 दुचाकी आणि एक चारचाकी वाहनांची तलवार आणि कोयत्याने तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीचे दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
मनोज पोपट खरात (वय-२८), संतोष सिद्धू पवार (वय-२३), करण ज्ञानदेव तिरकर (वय-१९), प्रविण सोमनाथ कांबळे (वय-१९ रा अजंठानगर), संग्राम विलास बागुल (वय-२५ वर्ष रा.संभाजीनगर), शुभम गोरखनाथ भिंगारदिवे (वय-२३ रा. संभाजीनगर चिंचवड) आणि अनिकेत चंद्रकात भोसले (वय-२२ रा. संभाजीनगर), सुनील मनोहर डोगरे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मनोज पोपट खरात यांच्या वडिलाला तक्रारदाराने शिवीगाळ केली होती. त्यामुळे धुळवडीच्या दिवशी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपीने मित्रांसोबत तक्रारदाराच्या घरासमोर जाऊन तलवार आणि कोयत्याने 4 दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे काच फोडून नुकसान केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित तक्रारदाराने फोनद्वारे पोलिसांना माहिती दिली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी महेंद्र आहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, तपास पथकाचे सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून भेट दिली. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस कर्मचारी किशोर पढेर, सतीश ढोले, रमेश मावस्कर आणि विजय बोडके यांना गुप्त माहिती मिळाली, की संबंधित गुन्ह्यातील आरोपी हे बहिणाबाई सर्प उद्यान संभाजीनगर येथे आहेत. त्यानुसार सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली.