पुणे - कश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर आता कश्मीरच्या शैक्षणिक विश्वात महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांनी योगदान द्यावे, या उद्देशाने पुण्यातील सरहद या कश्मीरसाठी काम करणाऱ्या संस्थेने आवाहन केले होते. या आवाहनानंतर महाराष्ट्रातील ७ शैक्षणिक संस्था कश्मीरमध्ये आपले महाविद्यालय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत.
केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत जम्मू-कश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर तिथल्या विकासाला चालना मिळेल, असे बोलले जात होते. त्याचाच प्रत्यय आता यायला सुरुवात झाली आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनेक नामांकीत शिक्षण संस्था आहेत. देशभरातून विद्यार्थी याठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. तसेच जम्मू-काश्मीर या ठिकाणाहून मोठ्या संख्येने विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. मात्र, आता ३७० कलम हटवल्यानंतर शैक्षणिक संस्थांना काश्मीरमध्ये आपले महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत.
सर्वच संस्थेने पुण्यासह महाराष्ट्रातील २५ शैक्षणिक संस्थांना कश्मीरमध्ये महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने विचारणा केली होती. सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. २५ संस्थांपैकी ७ शिक्षण संस्थांनी जम्मू-कश्मीरमध्ये शैक्षणिक संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने होकार कळवला आहे, अशी माहिती नहार यांनी दिली आहे. तसेच आणखीही काही संस्था पुढे येतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कश्मीरमध्ये जाऊन शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली जमिनी घेण्याचा विषय नसून या जमिनी लीजवर असतील. मात्र, तिथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न असल्याचे नहार यांनी यावेळी सांगितले. जम्मू-कश्मीरच्या शिक्षण विभागासंदर्भात बोलणी सुरू असून लवकरच तिथले शिक्षण अधिकारी पुण्यात येऊन चर्चा करतील, असे देखील नहार यांनी सांगितले आहे.