पुणे - कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी (दि. 21 जून) दिवसभरात कोरोनामुळे आणखी 6 जणांचा मृत्यू झाला असून, 620 नवीन रुग्ण आढळले. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 510 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे 12 हजार 474 रुग्ण झाले आहेत. रविवारी 171 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यातील 290 रुग्ण गंभीर असून यातील 60 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
रविवार सायंकाळपर्यंत पुण्यात एकूण 12 हजार 474 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 7 हजार 435 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बऱ्या झालेल्या 171 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 4 हजार 589 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 510 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा बारा हजारांवर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत चालली आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.
दरम्यान, राज्यभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नव्याने रुग्ण वाढत आहेत. रविवारी (दि. 21 जून) 3 हजार 870 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर 1 हजार 59 रुग्णांनी रविवारी (दि. 21 जून) कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 7 लाख 73 हजार 865 नमुन्यांपैकी 1 लाख 32 हजार 75 नमुने पॉझिटिव्ह (17.6 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 66 हजार 719 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 26 हजार 287 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
हेही वाचा - कात्रज-सिंहगड परिसरातील स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्राला बसला लॉकडाऊनचा फटका