पुणे : भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात मान्सूनचे आगमन साधारणत: 7 जूनच्या दरम्यान होते. मात्र यंदा कोकणात 11 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागात 24 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. जूनमध्ये सरासरी 207.6 मिमी पर्जन्यमान आहे. तर जून अखेरीस 110.9 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. म्हणजेच जून महिन्याच्या सरासरीच्या 53.4 टक्के पाऊस हा यंदा पडला आहे. तसेच राज्यात 5.25 लाख हेक्टर पिक पेरणी झाली असल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
५.२५ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी : गेल्या आठवड्यापासून राज्यातील विविध भागात पावसाला सुरुवात झाली असून जूनमध्ये कोकणात सर्वाधिक पाऊस झाला आहे. नाशिक विभागात म्हणजेच नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागात हलका पाऊस झाला. चालू वर्षात ५.२५ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये 32 टक्के पाऊस झाला होता, मात्र यंदा 53 टक्के पाऊस झाला आहे. ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट असल्याचे सुनिल चव्हाण म्हणाले.
जूनच्या अखेरीस चांगला पाऊस : गेल्या आठवड्यात कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन केले होते. मात्र आता जूनच्या अखेरीस चांगला पाऊस झाला असून ही शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे. गेल्या वर्षी जूनअखेर राज्यात १६.९२ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. यंदा ५.२५ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली आहे. म्हणजे गेल्या वर्षी जूनमध्ये 31 टक्के पेरणी झाली होती तर, यंदा 3.70 टक्के पेरणी झाल्याची माहिती सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली.
राज्यात जून महिन्या अखेरीस पावसाची स्थिती : जास्त कोकण विभाग (अतिवृष्टी), मध्यम पाऊस - नाशिक विभाग (नाशिक, धुळे, नंदूरबार), हलका पाऊस - पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभाग सरासरीच्या 25 टक्क्यापेक्षा कमी पाऊस राज्यातील 43 तालुक्यांमध्ये झाला आहे. तर, सरासरीच्या 25 ते 50 टक्के असलेल्या तालुक्यांची संख्या 569 इतकी आहे. सरासरीच्या 50-75 टक्के पेक्षा कमी तालुक्याची संख्या 101 आहे. सरासरीच्या 75-100 टक्के पेक्षा कमी पाऊस 32 तालुक्यामंध्ये झाला आहे. सरासरीच्या १०० टक्के पेक्षा अधीक पाऊस 20 तालुक्यात पडला आहे.
पिक पेरणी : सर्वसाधारण सरासरी क्षेत्र : १४२.०० लाख हेक्टर, गतवर्षी खरीप पेरणी : १६.९२ लाख हेक्टर, चालू वर्षी खरीप : ५.२५ लाख हेक्टरवर पीकांची पेरणी झाली. राज्यात अधिकतम पेरणी झालेल्या जिल्ह्यामध्ये धुळे, जळगाव, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच राज्यात अधिकतम कापसाची (९ टक्के) पेरणी झालेली आहे. तर, अद्याप पेरणी न झालेल्या जिल्ह्यामध्ये लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Mumbai rains : मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी साचले पाणी, वाहतुकीला बसला फटका