पुणे - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अवघ्या देशात सार्वजनिक प्रार्थना स्थळांवर एकत्र येण्यास नागरिकांना बंदी आहे. तसे आदेश राज्य शासन आणि केंद्र शासनाने दिलेले आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात मात्र नियमांची पायमल्ली करत ४० ते ५० जणांनी एकत्र येऊन एका इमारतीच्या छतावर नमाज पठण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी १३ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे गर्दी करू नका, असे आवाहन पोलीस प्रशासन करत असून दुसरीकडे मात्र काही जण पोलिसांना दाद देत नसल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष बिभीषण सपकाळ यांनी फिर्याद दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरावर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. याच शहरात पहिल्यांदा सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. विविध उपाययोजना करून कोरोना विषाणू आटोक्यात आणला आहे. मात्र, काही नागरिक मात्र याला अपवाद ठरत आहेत.
देशासह महाराष्ट्रात मंदिरे, प्रार्थनास्थळ नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात चिखली परिसरात काही व्यक्तींनी एकत्र येत एका इमारतीच्या छतावर नमाज पठण केला आहे. यावेळी ४० ते ५० जण नागरिक असल्याचे एका फोटोद्वारे समोर आले असून त्यानंतर चिखली पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे. एकूण १३ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींवर कलम १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदासह इतर कलम लावण्यात आले आहेत.