पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण होते. रुग्णांना सेवा देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवरसुद्धा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळेगुरव येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आयुश्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे कोविड सेंटर गुरुवारपासून कार्यान्वित झाले.
बेड कमी पडत असल्याने घेतला निर्णय -
गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या मोठी असल्याने हे कोविड सेंटर कमी पडू लागली आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत बेड कमी पडत असल्याने घेतला आमदार जगताप आणि त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी हा निर्णय घेतला.
रुग्णांना मिळणार आधार -
पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी, पिंपळेसौदागर या भागातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी या कोविड केअर सेंटरचा मोठा आधार मिळू शकेल.
कोविड केअर सेंटर नेमके कुठे आहे?
आयुश्री हॉस्पिटल कोविड केअर सेंटर, पिंपळेगुरव ७३/८, साई दर्शन ‘ए’ बिल्डिंग येथे हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये २० बेड ऑक्सिजनचे आहेत. डॉ. कांचन सराफ, डॉ. दिनेश फस्के, डॉ. जितेंद्र पटेल यांची टीम या कोरोना सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची सेवा करणार आहेत. हे सेंटर गुरूवारपासून कार्यान्वित झाले आहे. माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांनी या सेंटरची पाहणी केली.