पुणे : श्रीगौड ब्राम्हण समाजात मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत.त्यामुळे अनेक मुलांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न करत आपला जोडीदार निवडला आहे. त्यानंतर या समाजाच्या जातपंचायतीने त्यांच्या पूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील इतर मुलांची लग्न होत नाहीत. तसेच कुठल्याही नातेवाईकांच्या मंगल कार्यात अथवा दुःखद परिस्थितीत त्यांना सहभागी होता येत नाही. केवळ जात पंचायतीच्या मनमानी कारभारामुळे त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. यातून बाहेर पडता यावे यासाठी समाजातून बाहेर टाकलेल्या लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मदतीचा हात मागितला आहे. या लोकांच्यावतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुणे पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक बहिष्कार : श्रीगौड ब्राम्हण जातीची महाराष्ट्रात काही हजार कुटुंबे आहेत. ह्या समाजाच्या बाहेर कुणी लग्न केले तर त्यांच्यावर जातपंचायती कडून सामाजिक बहिष्कार टाकला जातो. तसेच त्यांना परत जातीमध्ये घेण्यासाठी लाखो रुपये दंड त्यांच्या कडून वसूल केला जातो. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र अंनिसकडे दाखल झाल्या आहेत.जातपंचायत मनमानी आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून महाराष्ट्रात असलेल्या सामाजिक बहिष्कार कायद्याच्या अंतर्गत तातडीने या विषयी कारवाई केली जावी. अशी मागणी अंनिसने केली होती. आत्ता या प्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल : या प्रकरणी प्रकाश डांगी यांनी तक्रार दाखल केली आहे. समजाचे पंच ताराचंद काळुराम ओझा रा. गंजपेठ पुणे, भरत नेमीचंद मावाणी रा. अरणेश्वर पुणे, प्रकाश लालूराम बोलद्रा उर्फ शर्मा रा. पद्मावती पुणे, संतोष उणेसा रा. भवानी पेठ पुणे, मोतीलाल भोमाराम शर्मा रा. गाव खिवाडा, जि. पाली राजस्थान, बाळु उर्फ गणेश शंकरलाल डांगी रा. पाषाण पुणे, प्रकाश आसुलाल ओझा रा. पर्वती पुणे, भवरलाल डांगी रा. मारवाड जंक्शन, राजस्थान, हेमाराम ओझा रा. गाव सिनला राजस्थान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
बेकायदेशीर प्रकार: श्री गौड ब्राम्हण समाजात जातपंचायतीची मनमानी चालू असून आंतरजातीय विवाह करणे, पुनर्विवाह करणे अशा कायदेशीर गोष्टीच्या आड येवून जातपंचाच्याद्वारे संबंधित कुटुंबाना बहिष्कृत करणे दंड ठोठावणे असे, बेकायदेशीर प्रकार सर्रास होत आहेत.सामाजिक बहिष्काराची भीती दाखवून 400 लग्न अडवल्याचा धक्कादायक आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने श्री गौड ब्राम्हण समाजात जातपंचायतीवर केला आहे.
हेही वाचा : Pune Crime खऱ्या पोलिसाकडेच बदलीसाठी पैशाची मागणी बनावट पोलीस अधिकाऱ्याला अटक