पुणे - भीमाशंकर येथील देवदर्शन करुन परतीच्या प्रवासाला असताना तळेघर येथे खासगी बस रस्त्याच्या बाजुला बस पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात ४ जण गंभीर जखमी तर २६ जण किरकोळ जखमी झाले आहे. जखमींवर मंचर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे देशभरातून अनेक भाविक येत असतात. मात्र, डोंगरटेकड्यांचा परिसर असल्याने या रस्त्यांवर सध्या अपघातांची मालिका सुरु आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास भीमाशंकरवरुन देवदर्शन करुन भाविक परतीचा प्रवास करत असताना विनायक ट्रॅव्हल या खासगी बसचा ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटुन हा अपघात झाला. भीमाशंकर रोडवर होणारे अपघात टाळण्यासाठी घोडेगाव पोलीसांकडून योग्य ती काळजी घेतली जाते. मात्र, वाहन चालक दिलेल्या सुचनांचे पालन करत नसल्याने अपघात होत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले