पुणे- पिंपरी-चिंचवड भागात घरातच बनावट नोटा छपात असल्याचा प्रकार काल रात्री उघडकीला आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख ९८ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
अभिषेक प्रदीप कटारिया (वय १९), ओंकार शशिकांत जाधव (वय १९), सुरेश भगवान पाटोळे (वय ४०), प्रमोद अमृत गायकवाड (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथक रवाना करण्यात आली आहेत.
दोन व्यक्ती बनावट नोटा घेऊन चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीला देणार असल्याची गुप्त महिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खंडोबामाळ चौक येथे नाकाबंदी करून संबंधित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याशी अधिक चौकशी केली असता आरोपी सुरेश भगवान पाटोळे याच्या घरी या बनावट दोन हजारांच्या नोटा छापल्या जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यांतर पोलिसांनी पटोळे याच्याकडून २ लाख ९८ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यात २ हजार रुपयांच्या १४९ नोट होत्या.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासूनच आरोपींकडून बनावट नोटा छापण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा- प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात महिला सफाई कर्मचाऱ्यांचे 'थाळी बजाव आंदोलन'