पुणे - बाथरूममध्ये लावण्यात आलेल्या गिझरच्या वायूमुळे गुदमरून खासगी शिकवणी घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. कोथरूडमधील संगम सोसायटीमध्ये मंगळवारी ही घटना घडली. रामराजे किशोर संकपाळ (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रामराजे हा संगम सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. मंगळवारी त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे शेजारच्या नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दरवाजा बंद होता. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रामराजे जमिनीवर पडले होते. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. गिझरमधून वायूगळती झाल्याने मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.