शिरूर (पुणे) - शिरुर तालुक्यातील नवले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील तीन भावांचा अवघ्या 15 दिवसात कोरोनाने मृत्यू झाल्याने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग असणारे व शेती हाच व्यवसाय मानून आपल्या कुटुंबांचे उदरनिर्वाह चालणाऱ्या तिघा बंधूंच्या जाण्याने कारेगावकरांना मोठा धक्काच बसला आहे.
हेही वाचा - ..तर कोरोनाची परिस्थिती गंभीर होईल, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
15 दिवसात तीन भावांचा मृत्यू
अधिक माहिती अशी की, कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पोपट नवले, सुभाष नवले, विलास नवले या तिघाही भावंडांना शिरूर तालुक्यातील विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, 23 एप्रिल रोजी उपचारादरम्यान थोरला भाऊ पोपट नवले (वय 58) यांचे निधन झाले. त्यानंतर चारच दिवसात म्हणजे 27 एप्रिल रोजी सुभाष नवले (वय 55) या मधल्या भावाचे निधन झाले, तर गुरुवारी (६ मे) धाकटा भाऊ विलास नवले (वय 52 ) यांचे निधन झाले.
पोपट नवले यांचे निधन झाल्यानंतर झालेले दु;ख बाजूला सारून त्यांचे दोन्ही भाऊ या आजारातून बरे व्हावेत आणि त्यांचा कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पंधरा दिवसांच्या आतच नियतीने तिघाही भावांना हिरावून नेले.
हेही वाचा - सलाम! नगरमध्ये कर्तव्यदक्ष मुलाने केली भाजीपाला विक्रेत्या आईवर कारवाई