पुणे - सोमवारपासून परराज्यातील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर एसटीने सोडले जात आहे. त्याद्वारे शहरातील वाकड परिसरातील 286 मजुरांना एसटीने कर्नाटकच्या सीमेवर सोडण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी परप्रांतीय मजुरांना खासगी बसने सोडत होते. त्यानंतर मंगळवारी लालपरीने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. शहरात हजारो परप्रांतीय मजूर कामासाठी आले असून अनेकजण इथेच राहतात. परंतु, जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणूने भारतासह शहरात देखील मोठ्या प्रमाणात पायमुळं पसरवली आहेत. त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आलीच पण मजुरांचे कामही गेल्याने मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. या मजुरांना लालपरीने त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत प्रशासनाकडून सोडण्यात येत आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार परप्रांतीय मजुरांना आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात जाऊन नाव नोंदवायच आहे. त्यानंतर पोलीस फोनद्वारे कळवून संबंधित व्यक्तीला किंवा कुटुंबाला एसटीने त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत रवाना करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. बस केवळ सीमारेषेवरच जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शहरात आणखी हजारो मजुरांना त्यांच्या मुळ राज्यात जायचे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे. या मजुरांना पाठवताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, वल्लभनगर बस आगार प्रमुख पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.