पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक कामगार, मजूर हे आपल्या मूळगावी जाण्यास अत्यंत आतुर आहेत. त्यामुळेच राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर सोडण्यात येत आहे. हिंजवडी परिसरातील तब्बल २५४ मजुरांना बुधवारी वल्लभनगर बस स्थानकातून एसटी बसने छत्तीसगढ (नागपूर देवरी) इथे रात्री उशिरा रवाना करण्यात आले आहे. यावेळी हिंजवडी पोलिसांनी रात्रीचे जेवण आणि पाण्याच्या बाटल्या सोबत दिल्याने माणुसकीचे दर्शन घडले आहे.
देशभरासह पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तिसऱ्या टप्प्याचे लॉकडाऊन संपत आलं असून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, चाकण परिसरातील कंपन्या सुरू झाल्या असल्या तरी कंटेनमेंट झोनमध्ये राहत असलेल्या मजुरांना त्या ठिकाणी काम करण्यास प्रतिबंध आहे. मजुरांच्या हातांना काम नाही, त्यामुळे अनेक मजूर हे भीतीपोटी आपल्या मूळगावी जाण्यास आतुर आहेत. गुरुवारी रात्री उशिरा हिंजवडी परिसरातील २५४ मजुरांना एसटी बसने छत्तीसगढ राज्याच्या सीमारेषा लगत असलेल्या नागपूर देवरी येथे सोडवण्यात येणार आहे. दरम्यान, २५४ मजुरांमध्ये अनेक लहान मुले, तरुण, महिला असे कुटुंब होते. त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्याची आस लागली असताना आज एसटी बसने ते त्यांच्या मूळगावी रवाना झाले आहेत. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्यासह हिंजवडी पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.