पुणे: पिंपरी- चिंचवडमध्ये चक्क 1 किलोमीटर रस्त्यासाठी 25 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेने आयुक्त शेखर सिंह यांना धारेवर धरले आहे. गेल्याच वर्षी 65 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी फूटपाथ बांधण्यात आले आहे. मग अर्बन स्ट्रीट संकल्पनेच्या नावाखाली 25 कोटींची कामे का ? असा प्रश्न माजी नगरसेविका माया बारणे यांनी उपस्थित केला आहे. नेहमी वर्दळ असणारा रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
महानगरपालिकेत सध्या प्रशासक लागू: यावर महानगरपालिकेचे सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे यांनी तो रस्ता 2 किलोमीटरचा असून तेथील फुटपाथची दयनीय अवस्था झाल्याचे सांगितले आहे. त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. प्रत्यक्षात मात्र फुटपाथ सुस्थित असल्याच चित्र ईटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत सध्या प्रशासक लागू आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या निधीला मंजुरीचा देण्याचा सपाटा आयुक्त शेखर सिंह यांनी घेतलेला दिसत आहे.
25 कोटी खर्च करण्यात येणार: अर्बन स्ट्रीट संकल्पनेच्या नावाखाली आदित्य बिर्ला ते डांगे चौक अशा 1 किलोमीटर रस्त्यावर 25 कोटी खर्च करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तेथील स्थानिक माजी नगरसेविका माया बारणे यांनी आक्षेप घेत तो निधी थेरगाव येथील रस्त्यांसाठी वापरावा असे आवाहन आयुक्तांना केले आहे. परंतु आदित्य बिर्ला ते डांगे चौक हे अंतर जवळपास 2 किलोमीटर असल्याचं सांगितले आहे.
65 लाख रुपये खर्च करून नवीन फुटपाथ: अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली नवीन फुटपाथ, विद्युत रोषणाई, ड्रेनेजच काम तिथं करण्यात येणार आहे. त्याला 25 कोटींचा खर्च येणार असून त्याला प्रशासकीय मान्यता घेतल्याच सहशहर अभियंता ओंबासे यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षीच्या 65 लाख रुपये खर्च करून नवीन फुटपाथ बांधण्यात आले आहे, असे असताना देखील आयुक्त शेखर सिंह हे कोणासाठी आटापिटा करत आहेत. असा सवाल माया बारणे यांनी विचारला आहे. करदात्या नागरिकांच्या पैश्यांची सध्या उधळपट्टी सुरू असल्याचे या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे येतं आहे. त्याला स्थगिती मिळणार का ? हे पाहावं लागणार आहे.