पुुणे- पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाईगिरीच्या वर्चस्वातून 23 वर्षीय तरुणाचा दगडी पाटा आणि कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील फरार झाले आहेत. त्यांचा शोध पिंपरी पोलीस घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शंकर गोविंद सुतार वय- 23 रा. हनुमान मंदिरासमोर विद्यानगर चिंचवड असे मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. त्याच्यावर आर्म ऍक्ट चा गुन्हा दाखल होता, अशीही माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी मृत तरुणाची आई निला गोविंद सुतार यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दिली आहे. संतोष चौगुले (वय-25), अजय कांबळे (वय- 23), मोसीन शेख (वय- 25), पप्पू पवार (वय- 28) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री मृत तरुण शंकर याच्यावर कोयत्याने वार करत दगडी पाटा डोक्यात घालून गंभीर जखमी केले होते. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान, जखमी शंकरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा आज(शनिवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मयत शंकरच्या आईने पिंपरी पोलिसात तक्रार दिली असून आरोपीच्या शोधात पिंपरी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
दरम्यान, संबंधित घटना पूर्ववैमनस्य आणि भाईगिरीतून झाल्याचं पोलिसांकडून प्राथमिक माहिती दिली गेली आहे. या घटने प्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे हे करत आहेत.